दलित म्हणून अन्याय-अत्याचार सहन करण्यापेक्षा समता सैनिक दलाचा सैनिक होऊन आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी समाजाचे रक्षक व्हा !”अगदी काल परवाच म्हणजेच एक म्हणजेच एक (01) ऑक्टोंबर 2023 रोजी औरंगाबाद येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बौद्ध समाज आणि समता सैनिक दलाचे एक दिवशीय अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.वास्तविक पाहता अशा समता सैनिक दलाच्या अधिवेशनाला जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. भारतीय बौद्ध महासभा (दक्षिण) उस्मानाबाद जिल्हा युनिटच्या सोबत मी ही औरंगाबाद येथे अधिवेशनाला उपस्थित झालो होतो.त्या ठिकाणी तापलेल्या उन्हात भर मैदानात आंबेडकरी घराण्याचे डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर च्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता सैनिक दलाचे मराठवाडा स्तरावरील संचलन सुरु होते.नागसेन वनाच्या मैदानामध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये समता सैनिक दलाने डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्यासमोर संचलन केले. तिथं आंबेडकर साहेबांच्या अगदी काही अंतरावरून मी,स्वतः संचलनाचे कव्हरेज घेत होतो.त्यावेळी मंचासमोर डॉ.भीमराव आंबेडकर इतक्या सादगीने समता सैनिक दलाच्या जवानांना सॅल्यूट करत होते की,त्यांच्याकडे पाहून मनामध्ये उर्मी जागी होत होती.या संचलनात जवळपास मध्यमवयीन,तरुण आणि महिला सैनिक,मनाला क्रांतीची प्रेरणा देणाऱ्या गणवेशात अर्थात सरकारच्या पोलीस प्रशासनाला ही हेवा वाटावा अश्या वर्दी (पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट,काळी लेस,,शिट्टी, डोक्यावर गोल लोगोसह टोपी,रँक निहाय मेडल आणि पायात कडक काळा बूट जणू काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छाताडावर थय-थयाट करण्यासाठीच आहे.) मध्ये ताट मानेने परेड करत डॉ.भीमराव आंबेडकरांना “सॅल्यूट” करून पुढे जात होते.हे संचलन अतिशय प्रेरणादायी वाटत होता.भीमराव आंबेडकरांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सर्व जवानांना प्रोत्साहन दिले.खरं तर समता सैनिक दलाच्या सैनिकांचे संचलन दर 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रच नाही तर देश्यातील प्रत्येक गाव-शहरात करण्यात आले पाहिजे.त्याच बरोबर या महत्वपूर्ण अधिवेशनामध्ये डॉ.भीमराव यशवंत आंबेडकरांनी जे विषय मांडले ते विषय अतिशय महत्त्वाच आहेत.भारतासह आपल्या राज्यातील लेणी आणि त्यांचे संवर्धन,भारतीय संविधानाची होणारी पायमल्ली,सध्याची बिकट राजकीय स्थिती आणि आपली भूमिका,समता सैनिक दलाच्या मजबूत बांधणीच्या अनुषंगाने जे जे काही विषय मांडले,ते विषय राज्यातील जिल्हा कार्यकारिणीने गाव स्तरापर्यंत शिबिरे,मेळावे व विविध कार्यक्रम घेऊन जनमानसात जनजागरण आणि विचारमंथन घडवून आणण्याचं काम केलं पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या उद्देश्याकडे पाहिल्यास असे लक्षात येते की, समता सैनिक दल या देशांमध्ये “वंश,धर्म,जात,लिंग आणि वर्ग इत्यादीवर आधारलेली विषमता नष्ट करण्यासाठी आणि सर्वांसाठी स्वतंत्रता आणि समानता या मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती करण्याकरिता सर्व घटकांना संघर्षासाठी एकत्र आणण्यास झटणे हे समता सैनिक दलाचे ध्येय आहे.”समता सैनिक दलाच्या उभारणीसाठी,समता सैनिक दलाच्या निर्मिती मागचा उपरोक्त महत्वपूर्ण उद्देश आपल्या भीमसैनिकांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी वरिष्ठ प्रशिक्षकांनी प्रत्येक प्रशिक्षण शिबिरात आणि कार्यक्रमातून आपल्या जबाबदार कार्यकर्त्यांनी समता सैनिक दलाचे महत्व त्यांचे ध्येय काय ? उद्धिस्ट काय ? त्याच बरोबर सैनिक होणे का आवश्यक याचे महत्व पटवून देणे अतिशय गरजेचे आहे.बांधवानों,समता सैनिक दलाचा मुख्य उद्देश म्हणजे या देशातील युवकांना एका ध्वजाखाली आणणे,त्यांच्या मनामध्ये स्वाभिमान,स्वावलंबन,समाजाप्रती समर्पित बलिदानची भावना विकसीत करण्याकरिता सामाजिक,सांस्कृतिक व इतर कार्यक्रम भारतीय लोकांमध्ये विशेषतः युवकांमध्ये घडवून आणण्यास समता सैनिक दल प्रोत्साहन देईल.त्याच बरोबर समता सैनिक दल त्यांचे ध्येय व उद्देशास पोषक कार्य करणाऱ्या संघटनांना आणि चळवळीस सहकार्य करेल, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक दलाच्या घटनेमध्ये व उद्देशांमध्ये म्हणतात.म्हणजेच ज्या तत्त्वांच्या आधारे माणसा माणसांमध्ये भेद निर्माण केले अशा विषमतावादी विचारधारेचा अर्थात मनुवादी आणि गांधीवादी विचारसरणीला खतम करण्यासाठी आपणास काम करावयाचे आहे.समता सैनिक दलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला नुसतं स्वयंसेवक बनवले नाही,तर लष्करी प्रशिक्षण देवून एक प्रशिक्षित सैनिक घडवले आहे.आज आम्हाला देखील ह्याच वर्दित आपली पिढी घडवण्याची संधी आहे.त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची स्वीकारलेली बौद्धिक आणि मानसिक गुलामी सोडून एका सैनिकासारखे प्रशिक्षित होऊन आपण आपले जीवन जगले पाहिजे.भविष्यातील धोके ओळखून आजच आपली ताकद निर्माण करणे काळाची गरज आहे.अन्यथा संकटकाळी हतबल होण्यापेक्षा आताच तयारीत राहू या !बांधवानों,आपण विद्यार्थी, निमशासकीय कर्मचारी,खाजगी क्षेत्रातील कर्मचारी,व्यवसायिक, दुकानदार किंवा मजूर,कामगार, शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार असा आपल्या आयुष्यात किंवा आपल्या घर आणि परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी आपण कोणत्याही प्रकारचा उद्योग व्यवसाय करत असताना,आपण ठरवलेलं ध्येय पूर्ण करत असताना,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील बौद्धिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ व सक्षम समाज निर्माण करण्यासाठी ह्या धम्म कार्यात एक “सैनिक” म्हणून धम्म चळवळीचे संरक्षक आणि स्वभिमानी सैनिक म्हणून आता उभा राहिले पाहिजेच.तरच आपल्या तरुण आणि जवान भीमसैनिक होण्याला एक निश्चित अर्थ आहे.अन्यथा बोलघेवडे बौध्द तरुण आनं रिटायर लोक पायलीचे पसा आपल्या समाजात मिळतातच ना…तर जबाबदार पदाधिकाऱ्यांनी लक्ष्यात घ्यावं की, तरुणांना समता सैनिक दला मध्ये मोठया संख्येने सामावून घेण्यासाठी काही विशेष प्रयोगांची सुद्धा गरज आहे.सैनिकांला कवयात,परेड,लाठी काठी फिरवीने,प्रशिक्षण इत्यादी सह बदलत्या काळानुरूप आजच्या काळामध्ये अत्याधुनिक जसे व्यायाम जिम,कुस्तीचा आखाडा,मार्शल आर्ट, (कराटे) इत्यादीच्या कार्यशाळा उभारणे गरजेचे वाटते.जसे की,समता सैनिक दलाच्या उद्देशिकेमध्ये सांगितले आहे की,सैनिक मानसिक-बौद्धिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असला पाहिजे. त्यासाठी आपणास ही आपल्या स्तरावर काही परिवर्तन करत नव्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे.तर आपण आजच्या तरुण पिढीला मोठ्या संख्येने समता सैनिक दलात सामावून घेऊ शकतो,असेच मनापासून वाटतं.आंबेडकरी समाजातील तरुणांनो,आपले अनमोल जीवन दारू सारख्या व्यसनात बरबाद करण्यात काय हशील आहे ? आजचा आपला बहुतांश तरुण व्यसनधिनतेच्या आहारी जाऊन आई – बापावर ओझेच आहे ना… तर मग भिमसैनिकांनो आई-बापाच्या जीवावरच खायचे असेल तर असं “व्यसनधीन” होऊन फुकटच खाऊ नका,तर डॉ.बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाचा एक सैनिक व्हा, आपल्या आई-बापाला पण बरं वाटेल,समाजात त्यांची इज्जत वाढेल आणि आंबेडकरी चळवळीतील जबाबदार भीमसैनिक तुमची जबाबदारी सुद्धा घेतील.भीमसैनिकांनो,आजवरचां आपला हा प्रवास निश्चित भविष्यातील घडामोडी साठी प्रेरणादायी आहे.चळवळीसाठी संघर्ष आणि संघर्षासाठी चळवळ अशी व्याख्या असतेच पण ध्येय आणि उद्धिस्ट काय व कोणते याचा ही विचार करणे गरजेचे आहे.सद्यस्थितीला गाव तिथल्या भीमनगरातील तरुणांचे चित्र अतिशय विदारक आहे.गाव तिथल्या भीमनगरात आपल्याच भीमसैनिक म्हनवून घेनाऱ्यांनी दारू/मटक्याची आणि सावकारकीची दुकाने थाटून बाबासाहेबांच्या तरुण पिढीला बरबाद करण्याचा ठेका सुरू केला आहे.त्यामुळे अशा या ठेकेदारां पासून आपण अलिप्त होऊन स्वतःला आणि आपल्या परिवाराला सावरण्यासाठी त्याच बरोबर तमाम आंबेडकरी समाजातील तरुण पिढीला सावरण्यासाठी समता सैनिक दलामध्ये आपण एक सैनिक होऊन कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे.भीमसैनिकांनो,समाजा अंतर्गत शत्रूचा सामना करणं खूप कठीण आहे ? त्यासाठी आपल्याला अगोदर आपल्या घर आणि परिवारासाठी व्यसनधिनते पासून अलिप्त ठेवणे अत्यंत गरजेच आहे. त्यासाठी समता सैनिक दल ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे.आपण तरुणांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. माझा तरुण हा निर्वसणी असला पाहिजे, तो मानसिक,बौद्धिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असला पाहिजे.त्यामुळं आमच्या तरुणांनी धम्म चळवळीत लक्ष घालून स्वतःचा, घराचा,परिवाराचा आणि समाजाचा फायदा करण्यासाठी बुद्धांच्या पंचशीलाची शिकवण अंगीकारली पाहिजे.त्यासाठी बाबासाहेबांची धम्म चळवळ आहे, हे आपण नीटपणे समजून घेतले पाहिजे.बौद्ध समाजाच्या निकोप वाढीसाठी “बुद्धांचा धम्म” आंबेडकरी तरुणांच्या मानसिक,बौद्धीक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत करण्याचा एकमेव मार्ग होय.ही मानसिकता आपल्या भीमसैनिकांच्या मनात रुजणार नाही,तो पर्यंत आपला सुवर्ण आणि क्रांतीकरी इतिहास टिकणार नाही.ही बाब आपण लक्ष्यात घेतली पाहिजे.कारण आप-आपल्या परिवाराचे संगोपन करणे जरी आपलं कर्तव्य असले,तरी सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी चळवळीला गतिमान करणं आपलेच आद्यकर्तव्य आहे,ज्यांच्या मुळं आज आपण हे वैभवशाली सम्मानाचे जीवन जगत आहोत.तर मग चला…..समता सैनिक दलाचा स्वाभिमानी “सैनिक” घडवण्यासाठी ! चला आपण सर्व “जन” या चळवळीचे पाईक होवू….बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाचे सैनिक होवू आणि उद्याच्या “भीम-पिढीचे” आपणच मार्गदर्शक होवू….!
विजय अशोक बनसोडे,
लेखक /संपादकजि.संघटक : भारतीय बौद्ध महासभा,उस्मानाबाद
8600210090/9881535736✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️