आधुनिक बुध्द व महाबुध्द हे एक षडयंत्र

बहुजन संघटक : बौध्द समाजात काही स्वतःला प्रतिष्ठित व विद्वान समजणारी मंडळी सध्या बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक बुध्द किंवा महाबुध्द बिरुदावली लावण्याचा खोडसाळ प्रचार व आततायी पणा करत आहेत. अशा लोकांचे एककल्ली वाचन असल्याने हा प्रकार निर्माण होत आहे असे म्हटले तर ते अयोग्य होणार नाही. काही लोक बोधिसत्व बाबासाहेब यांच्या ग्रंथाचा हवाला देऊन असे म्हणतात की,बोधिसत्व हे बुध्दत्व प्राप्त करत असताना दहा पारमिता व दहा बले प्राप्त करीत असतात,हे अगदी बरोबर आहे. पण बुध्दत्व प्राप्त करणारा व्यक्ती हा ग्रुहत्यागी असतो त्याने सांसारिक जीवनाचा त्याग केलेला असतो.तसे सर्वच बुध्दाच्या बाबतीत घडले आहे. एवढेच नव्हे तर तथागत गौतम बुध्दाच्या बाबतीतही हेच सत्य आहे. अर्हत व बुध्दत्व हे ग्रुहत्यागी व्यक्तीला साध्य होत असते. सांसारिक जीवन यापन करुन कोणीही अर्हत पद प्राप्त केल्याचे ऐकिवात नाही. तर बुध्दत्व ही फार दूरची गोष्ट आहे.बोधिसत्व बाबासाहेब हे आपणा सर्वांना प्राणप्रिय आहेत याबद्दल दुमत नसावे पण म्हणून त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या विचारावर आपले विचार थोपण्याचा जबरदस्तीपणा काय कामाचा? आज बोधिसत्व हयातीत असते तर अशा लोकांची त्यांनी खरडपट्टी काढली असती.बोधिसत्व आपल्या जिवंतपणी अनेकांना त्यांच्या पाया पडण्यासाठी मज्जाव करत असत.एवढेच नव्हे तर भगवान बुध्दाला सुध्दा विवेक बुध्दीने समजून घेण्याचा ते सल्ला देतात. त्यासाठी भगवान बुध्दाच्या कालामसुत्ताचा दाखला देतात ते कसे म्हणू शकतील की,मी बुध्दापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांनी असे कधीच म्हटले नाही. त्यांनी भगवान बुध्द,संत कबीर, व क्रांती ज्योती फुले यांना गुरु मानले होते. जर ते आधुनिक बुध्द असते तर त्यांना कोणाला गुरु म्हणण्याची गरज भासली नसती.बुध्द हे स्वयंभू असतात. त्यांचा कोणीच गुरु असत नाही ते स्वप्रयत्नाने धम्माचा मार्ग शोधतात व तो सामान्य जणांना दाखवतात.पण बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास जो धम्म दाखविला आहे तोच मुळात तथागत गौतम बुध्दाचा धम्म आहे.अशोक विजयादशमी दिनी नागपूर येथे बाबासाहेब यांनी स्वतः भिक्खू चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते दिक्षा ग्रहण केली व तेथे सपत्नीक भगवान बुध्दाच्या चरणी नतमस्तक झाले. भगवान गौतम बुद्ध कोणाचेही चरणस्पर्श केल्याचा कुठल्याही बौध्द साहित्यात तसा उल्लेख नाही. यादृष्टीने जर बाबासाहेब बुद्ध असते तर त्यांनी दिक्षेच्या दिवशी बुध्दाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले नसते. सुमेध बोधीसत्व यांनी संबोधी प्राप्त केल्यानंतर ते बुद्ध झाले व ते सारनाथ येथे जात असताना रस्त्यात एका उपक नावाच्या आजिवक संप्रदायातील साधूची भेट झाली, तेंव्हा त्या साधूने बुध्दाला तुम्ही कोण आहात असे विचारले असता,”मी बुद्ध आहे किंवा जीन आहे” असा आपला परिचय करून दिला,या घटनेवरुन असे लक्षात येते की, बुद्ध आपण बुद्ध असल्याचे कथन करतात,तसे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात मी बुद्ध आहे असे कधीच म्हटले नाही, उलट ते म्हणत की,मी बुध्दाचा नम्र उपासक आहे. अशा बोधीसत्वावर तुम्ही बुद्धच आहात म्हणून मुद्दाम त्यांच्या विचारा विरुद्ध नवनवीन बिरुदावली लावणे म्हणजे एकप्रकारे त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणे होय असे म्हटले तर त्यात असत्याचा मुळीच लवलेश सुध्दा सापडणार नाही.भगवान बुध्द कोणाचेही सरणगमण करीत नसतात,उलट इतरेजण बुध्दाचे सरणगमण करत असतात म्हणूनच धम्मदिक्षेच्या प्रसंगी बोधीसत्व बाबासाहेब यांनी बुध्द,धम्म व संघाचे सरणगमण केल्याचे सर्वविदीत आहे.तार्किक दृष्टीकोनातून विचार केला तर धम्मदिक्षेच्या सोहळ्याचे वर्णन केलेल्या लिखीत पुस्तकाचे नाव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदिक्षेचा अविस्मरणीय सोहळा असे वामनराव गोडबोले या लेखकाने लिहिले आहे, यावरुन त्या माननीय लेखकाने सुध्दा बाबासाहेब यांना बुद्ध ही संज्ञा दिली नाही.दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण भगवान बुध्दाची वंदना करताना कुठल्याही बौध्द देशात आधुनिक बुद्ध, किंवा महाबुध्द सरणं गच्छामि म्हणत नाही किंवा बाबासाहेब बुद्धं सरणं गच्छामि असेही म्हटल्याचे ऐकिवात नाही.या सर्व वास्तववादी दृष्टीने विचार केला तर बाबासाहेब यांना बुद्ध म्हणणे म्हणजे बाबासाहेब यांच्या भाषेत हा खोटा व खोडसाळ प्रचार होय असे म्हटले पाहिजे.बौध्द धम्मात चुकीच्या संकल्पना रुजली जाऊ नये हाच या लेखनप्रपंचा मागील उद्देश आहे हे सूज्ञ जणास विदित व्हावे ही प्रांजळ इच्छा आहे.नमोबुध्दाय! जयभीम 🙏

आयु. मिलिंद माचले, पुणे

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *