तो चालू शकत नव्हता, हात हलवू शकत नव्हता, त्याला दैनंदिन काम करण्यासाठी सुध्दा इतरांची मदत लागे. पण आपल्या शारीरिक व्याधी ला त्याने आपली कमजोरी न मानता स्वतः ला चळवळीसाठी समर्पित केलं, शेवटच्या क्षणापर्यंत चळवळीच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.ही कहाणी आहे बुद्धिवंत आणि चळवळ्या आशिष रोडगे या तरुणाची.
आशीष चा जन्म 82 च्या मध्यात म्हणजे 7 जुलै चा. अकोला त्याच जन्मगाव, बालपण अहेरित, कॉलेज यवतमाळात तर सध्या स्थायिक तो पुण्यात होता. तो अगदी लहानपणापासूनच हुशार. शिक्षकांचा लाडका. मित्रांचा आवडता. तो धावायचा , क्रिकेट खेळायचा, मस्ती करत फिरायचा.
तो धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आला, बुद्धिबळ च्या स्पर्धेतही त्याने बक्षिस मिळवलं. अक्षर अगदी मोत्यासारखं. हस्ताक्षराच्या स्पर्धेतही तो प्रथमच. त्याला शिकून खूप मोठं बाबसाहेबांसारख व्हायचं होत.
पण अचानक आशिष ला चालण्याचा स्नायू दुखण्याचा त्रास होऊ लागला. त्याला muscular distrophy नावाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. या आजारात व्यक्तीचे स्नायु हळूहळू कमकुवत होत जातात. त्याचे हात पाय आता काम करेंनासे झाले. त्याला इतरांच्या मदतीशिवाय आपले दैनंदिन काम करणे पण अवघड झाले. आता शाळेत जाणे पण बंद झाले,तरीही परिस्थितीवर मात करून BSc पर्यंत शिक्षण घेतले.
–
आशिषला शारीरिक व्याधींमुळे मित्रांसोबत फिरणे जमेना म्हणून त्याने पुस्तकांशीच मैत्री केली.त्याला इतिहास, राजकारण, वैद्यकीय, सामाजिक व धार्मिक विषयावर वाचन करायची विशेष आवड. अशातच वयाच्या 21 वर्षी प्रा.मा.म.देशमुख लिखित ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ नावाचं पुस्तक वाचलं त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांशी परिचय झाला. त्याने डॉ. बाबासाहेबांचे ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’, शूद्र पूर्वी कोण होते , बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध आणि कार्ल मार्क्स अशी विविध पुस्तक वाचली. इथूनच आशिष चा चळवळी चा पाया रचला गेला.
राजकीय सत्तेशीवाय परिवर्तन शक्य नाही, असे आशिष ला वाटू लागले आणि तो कांशीराम साहेबांच्या चळवळी शी जुळला गेला. कांशीराम साहेब हे बाबासाहेबांची चळवळ पुढे नेत आहेत, हे तो सर्वांना सांगे. अण्णा भाऊ साठेच’ ये आझादी झुठी है,देश की जनता भूखी है’ हे वाक्य भारतीय स्वातंत्र्याची व्याख्या करताना तो नेहमी वापरे.
त्याच्या मते चळवळ म्हणजे न्याय आणि हक्कासाठीचा लढा होय.सामाजिक अन्यायाविरोधात विचार परिवर्तन म्हणजे चळवळ.चळवळीसाठी लहानात लहान योगदान पण खूप महत्त्वाचे हे त्याला पटलेलं होत म्हणून तो नेहमी मित्रांशी संवाद करताना, घरी येणाऱ्या- जाणाऱ्याशी चर्चा करताना चळवळी विषयी बोले.जबरदस्त संभाषण कौशल्य असलेला आशिष अनेकांना चळवळीसाठी प्रेरीत करायचा. व्यक्तीने चळवळीसाठी फार काही वेगळे न करता ,आपल्या व्यावसायिक आणि वयक्तिक कौशल्याचा वापर केला तरी खूप झाले असे तो म्हणायचा. जसे एखादया IT वाल्याने जर वेबसाईट व सोशल मीडिया साठी मदत करने.
–
देशभरातल्या चळवळी, संघटना व आंदोलने यांची माहिती आशिष इंटरनेट ,you tube, फेसबुक च्या माध्यमातून घ्यायचा. डॉ.सुरेश माने , वामन मेश्राम, प्रा. मा.म. देशमुख, आ. ह. साळुंखे, रविशकुमार अशा अनेकांची तो भाषणे you-tube ऐकत राहायचा. सामाजिक विकासासाठी राजकारणाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असायचा. कुठल्याही चळवळी ला यशस्वी करण्यासाठी विद्वान व दूरदृष्टी असलेल्या नेत्याची गरज असते. त्यामुळं संविधानतज्ञ म्हणून भारतीय संविधानावर डॉक्टरेट करणारे डॉ.ऍड.सुरेश माने सरांच्या राजकीय विचारानं प्रभावित होऊन तो BRSP शी जुळला. त्याने चळवळ निधी उभारण्यासाठी फोन वरून लोकांना चळवळ समजावून सांगून 51 हजार रुपये जमवले. चळवळीला अर्पण केले. त्याचा कार्याची पावती म्हणजे त्याचा सत्कार डॉ. सुरेश माने सर यांच्या हस्ते BRSP च्या अधिवेशनात करण्यात आला.
TV च्या बातमीवर त्याचा विश्वास नसायचा, कारण हिटलर नीती प्रमाणे मीडिया 100 दा खोट्या गोष्टी आपणावर थोपवून ते सत्य असल्याचं भासवतो. त्यामुळं आपला स्वतंत्र मीडिया असावा, असे तो नेहमी म्हणायचा. सोशल मीडिया ला आपला मीडिया मानायचा. रविश कुमार लिखित The Free Voice- Democrecy, culture and Nation हे पुस्तक वाचले. त्यामुळंच निर्भीड, सच्चा पत्रकार म्हणून तो रवीशकुमार त्याला रुचायचे.
आशिषला संगीताची विशेष आवड. भावाने दिलेला यामाहा चा कीबोर्ड तो छान वाजवायचा. त्याला संगितातले अनेक राग यायचे. तो ते अनेकांना शिकवायचा. एकदा गोव्याच्या एका हॉटेल मध्ये त्याने ‘ऐ शाम मस्तानी’ हे गाणं सादर करून अनेकांची मने जिंकली. परंतु वाढत्या व्याधी मुळे पुढे हे छंद जोपासने त्याला शक्य झाले नाही.
–
आशिष ने आपल्या आजारपणाच्या संबंधाने अनेक पुस्तके वाचली.तो आपल्यासारख्या आजारी लोकांना मार्गदर्शन करायचा. अनेक specialist आणि एक्सपर्ट डॉक्टर चे पत्ते द्यायचा. त्यांना पुस्तके वाचण्यासाठी , विपश्यना करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा.
त्याचे निसर्गावर प्रचंड प्रेम. झाडी, फुले, प्राणी, पक्षी यांच्या समवेत त्याचे मन रमायचे. त्याने अनेक पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. चीन (बीजिंग) ला डॉक्टर ला भेटण्यासाठी गेले असता त्याने अनेक विहार, बौद्ध स्थळे, ऐतिहासिक स्थळाना भेटी दिल्या. यादरम्यान सर्व स्थळं भेटीच्या ठिकाणं आशिष ने च ठरवली होती. सिंगापूर ला त्याने पोपटाला जेवू घातले होते. त्याने या दौऱ्यात बुद्ध संस्कृती, विहार इत्यादींचा अभ्यास केला होता.
तो गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं ,शालेय वस्तू भेट द्यायचा. स्वतः च्या वाढदिवसाला पुस्तके विकत घेऊन इतरांना वाटायचा. दोन कपाट भरून त्याने विविध विषयांवर पुस्तके जमा केली होती. ‘पुस्तके वाचून विचारवंत तयार होतात आणि तीच आंबेडकरी चळवळ चालवू शकतात. म्हणून आपली सर्व पुस्तके वाचनालयात दान करण्याचा त्याचा मानस होता.
–
आशिष ची इच्छा होती की कोलंबिया विद्यापीठातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर कोट घालून वंदन करण्याची…
त्याने आईला सांगितले की माझ्या मृत्यूशय्येवर फुले न ठेवता फक्त पुस्तकं ठेवायची…
असा हा चळवळीचा योद्धा 21. 08. 2019 ला शांत झोपेत निर्वाण पावला.
असा लढवय्या आशिष एकच पण त्याच्या प्रेरणादायी प्रवासातून चळवळीत अनेक आशिष निर्माण व्हावेत..
आशिष …
तू सदैव
आठवणीत
राहशील..
शत शत अभिवादन..
शब्दचित्रण- राहुल खांडेकर