‘बहुजन संघटक’   कल्पक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म

  बहुजन समाजातील ४  पोरांनी एखाद्या दादा भाईच्या नावाने मित्र मंडळ स्थापन करून त्याच्या नावाचे टी-शर्ट घालत जयंतीच्या कार्यक्रमात डिजेवर ताल धरतांना आपण अनेकदा पाहिले असेल. या अर्धवट पोरांना आणि त्यांना  स्वतःच्या राजकीय उद्दिष्टासाठी चलाखीने नाचवणाऱ्या पुढाऱ्यांना चपराक बसावी आणि त्यांनी वेगाने शुद्धीवर यावे असे आश्वासक कार्य पुण्यातील ४ तरुण वर्षभरापासून करीत आहेत. 

    ‘बहुजन संघटक’ या  फेसबुक पेजच्या माध्यमातून या  तरुणांनी  बहुजन समाजातील विविध व्यक्तीना विनामूल्य फेसबूक प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे.

त्यांच्या या प्रयोगाला कारण ठरले ते कोरोना लॉकडाऊन. मार्च २०२० ला  भारतात कोरोनाचा प्रकोप सुरू झाला. परिणाम स्वरूप सरकारला लॉकडाऊन करावे लागले.  सारे जनजीवन ठप्प झाले. वृत्तपत्राच्या पानातून कोरोना प्रसारित होतो अशीही आवई उठली.  यातून बहुतेक वृत्तपत्रांची कैक महिने छपाई देखील बंद होती. केवळ ऑनलाइन स्वरूपात अंक निघू लागले. लोकही तेच वाचू लागले. महापुरुषाच्या सार्वजनिक जयंती पुण्यतिथ्यांचे  कार्यक्रम देखील रद्द झाले. घरातल्या घरात जयंती साजरी करा असे सरकारी आदेश निघाले. हा काळ म्हणजे मोठा आत्मसंशोधनाचा, नवनव्या प्रयोगाचा ठरला. नेमके याच काळात ‘बहुजन संघटक’ नावाचे फेसबुक पेज सुरू झाले. बहुजन महापुरुषांचे विचारकार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी कल्पक विचार करणारे राहुल खंडेकर, सर्वजीत बनसोडे, हर्षल थूल आणि सौरभ गाणार या चार तरुणांनी पुण्यातून हा प्रयोग केला. ‘बहुजन संघटक’ या पेज च्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेला फेसबुक लाईव्ह हा प्रयोग प्रचंड लोकप्रिय ठरला. लाखो लोकांनी तो पाहिला. लोक  त्यासाठी दररोजची वेळ राखून ठेवत.  घरातील प्रत्येक सदस्याने ही व्याख्याने ऐकली.  वैचारिक मशागत आणि चळवळीच्या नांगरटीचाच जणू हा प्रयोग ठरला. आजही हा उपक्रम सुरू असून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या वर्षभरात जवळपास २ हजार वक्ते या पेज वर येऊन गेले. त्यात लेखक, साहित्यिक, शाहीर, कलावंत, अधिकारी आणि बहुजन समाजाचे सजग राजकारणी देखील होते. ‘बहुजन संघटक’ वर येऊन गेलेल्यांमध्ये प्रामुख्याने ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे, श्रावण देवरे, संजय सोनवणी, यशपाल भिंगे, डॉ. सोमनाथ कदम, शांतीस्वरूप बौद्ध, डॉ. संजय खोब्रागडे,  डॉ. आशालता कांबळे, डॉ. सुरेश वाघमारे, सनदी अधिकारी राजेश ढाबरे, सिद्धार्थ खरात, पत्रकार संजय आवटे, पुरुषोत्तम आवारे पाटील, शाहीर संभाजी भगत, राहुल आन्विकर, अनिरुद्ध वनकर, डॉ. गणेश चंदनशिवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, आ. अमोल मिटकरी, ना. बच्चू कडू, माणिकराव ठाकरे, आनंदराज आंबेडकर आदीसह कैक मान्यवरांचा समावेश आहे. ही नामावली खूप मोठी आहे.  त्यातील मान्यवरांचे त्यांच्या क्षेत्रातील कर्तुत्वही तितकेच मोठे आहे. विशेष महत्त्वाचे हे की, संबोधी देशपांडे, संघमित्रा खोरे,  सुनीता सावरकर या भगिनींच्या फेसबुक लाईव्हला तर विक्रमी प्रतिसाद मिळाला. या लाईव्ह मधून त्यांना लाखो चाहते मिळाले. आजही हा आकडा दररोज हजारोने  वाढतो आहे. त्यांचे व्याख्यान फेसबुक पेजवर अधिकाधिक लोक ऐकत आहेत. 

    या कल्पक प्रयोगा संदर्भात व्यवसायाने इंजिनअर असलेले  राहुल खांडेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, गतवर्षी १० एप्रिल २०२०  पासून आम्ही हा प्रयोग सुरु केला. सुरुवातीला दिवसभरात ४  ते ५  तास विविध वक्ते, गायक, कलावंत यांच्यासाठी राखीव असायचा. रात्री 8 ते 9  हा प्राईम टाईम विशेष वक्त्यांसाठी असायचा. प्रत्येक वक्त्याचे विषय आम्ही ४ दिवस आधी निश्चित करतो. त्याची मोफत जाहिरात करतो.  त्यामुळे या उपक्रमास लोकांचा भरीव प्रतिसाद मिळत जातो. येत्या ९  एप्रिल २०२१  रोजी फेसबुक लाइव्ह उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत आहे.  मा. शांतीस्वरूप बौद्ध यांच्या मृत्युनंतर मे २०२० मध्ये फक्त आठ दिवस दुखवटा  म्हणून कार्यक्रम बंद होता. त्यानंतर हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे. ‘बहुजन संघटक’ वर लाईव्ह असलेला हाच उपक्रम ‘ग्लोबल आंबेडकराईट’ या पंजाब मधील पेजवर देखील काही काळ दाखविण्यात आला.  फेसबुक पेज वर लाईव्ह येणाऱ्या मान्यवरांना आम्ही अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देतो. मुक्तपणे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणूनच आम्ही याकडे बघतो. 

     राहुल खांडेकर हे परिवर्तन चळवळीचे अभ्यासक आहेत. बहुजन समाजाचा सक्षम प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया नाही याची त्यांना जाण आहे.  ही कमतरता भरून काढण्यासाठीच त्यांनी हा कल्पक प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे. या प्लॅटफॉर्मला  खऱ्या अर्थाने त्यांनीच  सोशल प्लॅटफॉर्म केले  आहे. बहुजन समाजाच्या उन्नतीचे, प्रगतीचे आणि  महापुरुषांच्या विचारांचे कन्टेन्ट देण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. बहुजनांच्या मीडियाची अल्पस्वल्प  कमतरता त्यांनी याद्वारे भरून काढली आहे.  एखादा उपक्रम आरंभशूर पद्धतीने होतो आणि नंतर  थांबतो अशा  बहुजन शोकांतिकेला खोटे ठरविणारा हा प्रयोग आहे.  यामुळेच त्याचे  करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.  बहुजन समाजाच्या डोक्यातील विचारांचा बॅकलॉग भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. सोशल मीडियावरील हा  प्लॅटफॉर्म म्हणूनच चळवळीसाठी  कल्पक आणि आश्वासक आहे. त्याचे मी कौतूक करतो.

(जिज्ञासूंसाठी राहूल खांडेकर यांचा मो. क्र- 9284631198)

– रविंद्र साळवे/बुलडाणा

 मो. ९८२२२६२००३

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *