जिचा जन्मच नाकारला गेला. पारधी म्हणून व्यवस्थेने सुद्धा झिडकारले. बालपण जिला जगताच आलं नाही. वडिलांच्या प्रेमापासून जी वंचीत राहिली. पोटभर भाकर कधी पोटाला भेटली नाही. गावात भीक मागून घर पोसण्याचे काम करत राहीली. अनवाणी पायाने गुरं राखायची. गावकुसबाहेरील वस्तीत पोलीस येऊन कुणालाही कधी उचलतील याचा नेम नाही, याचं भीतीत तिचं जगणं. शिक्षणाची सगळी वाताहत. काही ध्येय नव्हतं,ना भविष्याची चिंता, ना जींदगाणीची चीड. सारं गुलामीचं जगणं जगत होती. नशीब गोड मानून पुढे चालत होती. अशात एक बाबा भेटतो. तिच्या जीवनाचा अर्थ समजावुन सांगतो.पहिल्यांदाच तिच्याशी वस्तीतील व्यक्ती हे आदराने बोलतात, प्रेमाने विचारपूस करतात.”आपण माणूस आहोत” याचा पहिल्यांदा प्रत्यय तिला आला. अन् तिच्या जीवनात क्रांती झाली…आणि तिने तिच्यासारख्या अनेकांच्या जीवनात क्रांती आणण्याचं काम केले…ही प्रेरणादायी कहाणी आहे “क्रांती संस्थेच्या” अध्यक्षा.. सुनीता भोसले यांची.
सूनिताची घरची परिस्थिती तशी बरी. बापाचं काम “तितर बाट्याची शिकार” करणं आणि त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. सुनिता भोसले यांचा जन्म हा 1978 साली शिरूर तालुक्यातील आंबळे या गावी झाला. याचं सालात अनिता- सूनिताची मोठी बहीण आणि त्यानंतर एक भाऊ (जो मयत झाला) त्याचा सुद्धा जन्म झाल्याची शाळेच्या दाखल्यावर नोंद आहे. अनिता नंतर झालेला भाऊ वारल्यामुळे प्रेग्नेंट राहिलेल्या सुनीताच्या आई-वडिलांना मुलगाच हवा होता. पूर्वी बाळंतपण घरीच होत असतं. सुनिताच्या आईला कळा सुरू झाल्याने वडिलांनी पोटावर पाय देऊन मुल होण्यास मदत केली. यावेळी ताई नावाची एक बाईच आई जवळ होती बापाला “मुलगी” झाल्याचे कळताच बाप तो दूर जाऊन बसला आणि आईने सुद्धा मान फिरवली. घरात पाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः तिला उचललं. बाळंतपणासाठी मदतीला असलेल्या ताई नावाच्या बाईने कुत्र्याच्या तावडीतून सोडवून तिला आणलं. घरात नाराजीचं वातावरण होतं. त्यामुळे तिच्याकडे सतत दुर्लक्ष करण्याचे काम कुटुंबानं केलं, बापानं कधी तिला कुरवाळलं नाही की जवळ घेतलं नाही.
अशातच सुनीता चार वर्षाची असताना सुनीताच्या वडिलांचा घातपात झाला. घरची परिस्थिती खालावली, खायला अन्न मिळेनासं झालं. पारधी जमातीत सामाजिक प्रथा होती की नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीचा प्रपंच हा दिरा सोबत लावून दिला जायचा. सुनीताच्या आईला सुद्धा दिरा सोबत प्रपंच करण्यासाठी विचारण्यात आले. तीन मुलं असलेल्या सुनीताच्या आईने नकार दिला, त्यामुळे सुनीताचा काका तिच्या आईला शिव्या घालून लगट करण्याचा प्रयत्न करायचा. सूनीताच्या आईचे रक्षण करण्याची जबादारी सूनीताची आजी आणि तिच्या भावंडांनी पार पाडली.
सुनीतानंतर झालेल्या भावाला (अविनाश) आणि अनिताला शाळेत टाकले होते. सूनीताला मात्र शाळेत टाकले नव्हते. तिला गुरे राखण्याचे काम देण्यात आलं. शाळेतून आलेल्या बहीण-भावांच्या कविता ऐकून तिला सुद्धा शाळेत जाण्याचा मोह आवरत नव्हता. सतत आईला शाळेत जाण्याचा हट्ट सुनीता करू लागली. सुनिताच्या आईला एकदा तिच्या वडिलांनी कसल्याशा भांडणातून दगड मारला आणि आईचा हात कायम अपंग झाला होता त्यामुळं ती काम करू शकत नव्हती.अशात सर्वांना अन्न देण्याची जबाबदारी ही सूनिताचीच.
शाळेत गेल्यास अन्न कोण आणणार हा प्रश्न असल्यानं सुनीताला शाळेत घालता येणे शक्य नव्हते. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्याच्या अटीवर आईने सुनीताला शाळेत घातले. शाळेतून आल्यानंतर सुनीता गावांत भाकर मागायची. कुणाच्या घरी भाकरीसाठी सडा सारवण करून द्यायची. मिळेल ते काम करायची. त्याच्या बदल्यात भेटलेल्या भाकऱ्या घरी आणून सर्वांना खायला मिळत असे. पण एक गोष्ट मात्र चांभार, मांग महाराच्या वस्तीत मात्र भिक मागण्यास आईने बंदी केली होती. सुनीता आंबडे गावाजवळील 5 किलोमिटर वर असलेले नावरे गावात भरलेल्या बाजारानंतर फेकून बटाटा, वांगी, कोबी अशा भाज्या ह्या पायी जावून जमा करून आणायच्या आणि आठवडाभर पुरवायची.गावात कधी मेलेल्या कोंबड्या, बकऱ्या घरी घेऊन येवून त्याचे मटण वाळवून अनेक दिवस पुरवण्याचे काम करत असत. एकदा शाळेचे कपडे घेण्यासाठी सूनिताने आईजवळ हट्ट केला. पण पैसे नसल्याने ते शक्य नव्हतं. त्याच दरम्यान अविनाशला गावातील दूरच्या शेतात दोन तीन दिवसापूर्वी मेलेल्या बकरीची माहिती मिळाली. बकरीला किडे लागले होते, प्रचंड वास येत होता. त्याने तिला उचलून स्वच्छ केलं. तिचं कातडं काढले आणि बाजारात 25 रुपयाला विकले आणि त्यातून सुनीताला शाळेचा ड्रेस घेऊन दिला. शाळेतली इतर मुलांची वागणूक सुद्धा चांगली नव्हती. कोणी सुनीताला सामावून घेत नव्हतं.
एकदा सुनीताच्या वस्तीत पोलीस आले. त्यांनी संशयित म्हणून अनेकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्याच्या भीती पोटी आपल्याला व आपल्या मुलांना सुद्धा पोलीस घेऊन जातील या भीतीने सूनीताच्या आईने गांव सोडून शिरूर ला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
सुनीता 11वर्षाची होती. पाचवीत शिकत होती.
“मानवी हक्क अभियानाची परिषद” अहमदनगरला आयोजित केली होती. त्यानिमित्ताने “मानवी हक्क अभियान” चे कार्यकर्ते राजेंद्र काळे यांचे शिरूरच्या पारधी वस्तीत येणे झाले. त्यांनी या परिषदेत येण्यासाठी सर्वांना निमंत्रण दिले. या परिषदेसाठी सुनीता आपल्या आईसह उपस्थित राहिल्या.
“ज्याप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो त्याचप्रमाणे येथील भिल्ल,आदिवासी पारधी हा सुद्धा माणूस आहे. आपण शिकलो म्हणून आपल्याला आपल्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव आहे,परंतु आदिवासी, भिल्ल, पारधी भटके यांना अजूनही आपल्या अधिकारांची जाणीव नसल्याने त्यांच्यामध्ये नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे” असे ठसठशीत मनावर बिंबणारे जिजाचे (एकनाथ आवाड) भाषण ऐकले. जिजा आपल्या भाषणामध्ये, दलित आदिवासी भटके यांच्या अत्याचारांच्या संदर्भाने पोलिसांना आव्हान देत होते, न्यायाची मागणी करत होते. ते आमचे हक्क आणि अधिकार समजावून सांगत होते.
या कार्यक्रमात अनेक लोक उपस्थित होते ज्यांनी पहिल्यांदा सुनिता आणि तिच्या आईला माणूस म्हणून त्यांची विचारपूस केली. त्यांच्या सोबत प्रेमाने व्यवहार केला. पहिल्यांदा सुनीताला आपण माणूस असल्याची जाणीव झाली इथूनच पुढे सुनीताच्या आयुष्याला क्रांतिकारक कलाटणी मिळाली. सुनीता ने ठरवलं की आपण या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे इथूनच आपण आपल्या समाजाला न्याय देता येऊ शकतो.
सुनीताने “मानवी हक्क अभियानामध्ये” काम करण्याचे ठरवले. दोन महिन्यानंतर मानवी हक्क अभियानाची पदयात्रा नगर ते नांदेड काढण्यात येणार होती. या पदयात्रेत सुनीताने सहभागी झाली. या पदयात्रेत सर्वात कमी वयाची आंदोलनकारी होती. त्यामुळे जीजा तिला मुलीप्रमाणे सांभाळत. सुनीता अंगावर एकच ड्रेस घालून आली होती. जिजानी तिला नवीन कपडे घेऊन दिले. तिच्यासाठी छोटसं घड्याळ आणि चप्पल चप्पल सुध्दा घेतली. ज्या गावात पदयात्रा जात होती त्या गावात जिजा सुनीताला महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्यासाठी सांगत. उंची कमी असल्याने कार्यकर्ते सुनीताला खांद्यावर घेत आणि ती महापुरुषांच्या पुतळ्यास हार घालत असे. या पदयात्रेत सुनीताला खऱ्या अर्थाने समाजाच्या एकतेची ताकत समजली.आपले हक्क समजले. नशिबावर विश्वास असलेल्या सुनीताला पहिल्यांदा समजले की आपले भविष्य घडवण्याची व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून घडवून ठेवले आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे इत्यादी महापुरुषांनी आपले नशीब आपण जन्माच्या अगोदरच उज्ज्वल करून ठेवले आहे.
सुनीता पूर्णवेळ कार्यकर्ता झाली. तिने मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून अट्रोसिटी, IPC चे वेगवेगळे कलम, गायरान जमिनीचे हक्क, पोलिसाशी आणि प्रशासकीय यंत्रणेशी संवाद असे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले. या प्रशिक्षणामुळे प्रचंड आत्मविश्वासपूर्वक सुनीता शिरूर तालुक्यातील आदिवासी, भटके, भिल्ल , पारधी, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी कार्य करू लागली.
जिजाच्या प्रेरणेने सुनीताला सामाजिक कार्य करण्यासाठी “स्वीसेड फेलोशिप” मिळाली
शिक्षण, आरोग्य, अन्याय अत्याचार निवारण आणि नागरिकत्व पुरावा पारधी v भटक्या समाजाला मिळावा यासाठी 2012 “क्रांती संस्था” स्थापन केली. महात्मा फुले म्हणतात की आपल्या सर्व दुःखाचे कारण हे अज्ञान आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी, तिला आव्हान देण्यासाठी आपण आपले शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे याची जाणीव सुनीता यांना झाली. सूनिताचे पाचवी नंतर शिक्षण सुटले होते.आपण एकटे शिकल्यापेक्षा आपल्या सारखे अनेक शाळा सोडलेले विद्यार्थी आहेत. त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन देवून शिकवण्याचे सूनीताने ठरवले. 2014 ला चार विद्यार्थ्यांची प्रवेश शुल्क भरून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून प्रवेश घेवून दिला. स्वतःच्या एडमिशन ला पैसे नसल्यामुळे सुनीताला त्यावर्षी प्रवेश घेता आले नाही. नंतर एका सरांनी सूनीताचे 1800 रुपये भरले आणि तिने BA प्रवेश मिळवला.
2015 ला “आदिवासी फासेपारधी समाज संघटन” ची स्थापना केली. याचे अध्यक्ष राजेंद्र काळे तर महिला प्रमुख सुनीता भोसले यांनी महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात अन्याय अत्याचाराच्या विरोधात, नागरिकत्व पुरावा मिळवण्यासाठी, गायरान जमिनीच्या हक्कासाठी काम सुरू केले.
आज जवळपास 120 विद्यार्थी शिक्षणासाठी सुनिताने दत्तक घेतले. त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. त्यामध्ये पारधी, आदिवासी, मातंग, बौद्ध, ओबीसी आणि काही ओपन असे सगळे विद्यार्थी आहेत. त्यांची शैक्षणिक प्रगती तपासणे. त्यांच्या वह्या, पुस्तक, कपडे इत्यादी गरजा बघणे. त्यांच्या शालेय शुल्काची व्यवस्था करणे असे अनेक काम सुनीता आपल्या क्रांती संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. त्यात त्यांना मध्येच शाळा सोडणे, आई वडिलांनी मुलांना मजुरी साठी बाहेरगावी नेणें, मुलींचे बालविवाह होणे इत्यादी आव्हान आहेत. बाल मजुरी रोखणे,बाल विवाह रोखणे यासाठी बालक आणि पालक संवाद घडवून आणणे, पालकात जागृती निर्माण करण्याचे कार्य सुनीता सतत करत आहेत.
कोरोना काळातील अनेक पारधी आदिवासी घरात दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे काम सुनीताने समाज मदतीतून केले.
आपला आदर्श आणि प्रेरणा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णा भाऊ साठे, सावित्रीबाई फुले, राणी अहिल्या देवी इत्यादी असल्याचे सुनीता आवर्जून प्रत्येक ठिकाणी सांगतात.
‘एकनाथ आवाड’ नसते तर सुनीता ही कोणत्या तरी रस्त्याच्या सिग्नलवर आपल्या 5-6 लेकरांना घेऊन भीक मागत असते, आणि नवरा कोण्या जेल मध्ये असता. जीजानी खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे मला बनवले असे सुनीता भावूक होवून सांगतात. सुनीता आजही अविवाहित असून फुले शाहू आंबेडकरी वीचाराच्या कार्यकर्त्यांशीच विवाह करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी अनेक तरुणांना लग्नास नकार दिला आहे.
“विंचवाचे तेल” हे त्यांचं प्रसिद्ध आत्मकथन आहे.
येत्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी हॉस्टेल अगर आश्रमशाळा निर्माण करून वंचीत,आदिवासी, पारधी ,भटक्या अशा समुहाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची सुनीताची भावना आहे. सुनीता या व्यवस्थेला शरण न जाता, तिच्याशी हातमिळवणी न करता, या व्यवस्थेशी दोन हात करते. या व्यवस्थेला जाब विचारून ती थांबत नाही तर रणरागिणी प्रमाणे आपले उपाय शोधत पुढे जात राहाते.
नुकताच सुनीता भोसले यांना प्रतिष्ठित असा मानाचा महाराष्ट्र फौंडेशन सामाजिक पुरस्कार 2021 प्राप्त झाला. सुनीता यांचा कार्याचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला.
सुनीता भोसले यांच्या पुढील कार्यास सदिच्छा आणि मंगल कामना..!!!
- राहुल कुमार, संयोजक, बहुजन संघटक मीडिया. पुणे.