महात्मा फुले महिला मुक्तीच्या आंदोलनाचे नायक

राहुल खांडेकर, 

MA- प्रथम वर्ष, मराठी विभाग.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे -411028

ईमेल – rahuknkhandekar@gmail.com

 प्रस्तावना : 

ढोर गवार शूद्र पशु नारी, 

सब ताडण के अधिकारी तुलसीदासांच्या रामचरितमानस मधील या ओळी स्त्रियांच्या बाबतीत समाज मानसिकता कशी आहे हे स्पष्ट करतात.

महिला म्हणजे भोग वस्तू. त्या आपल्या गुलाम आहेत. सेवा करणे एवढेच त्यांचे कार्य आहे. मनुस्मृतीप्रमाणे सर्व स्त्रियांचा वर्ण शूद्र, अशा प्रकारची सामाजिक मानसिकता ही पेशव्यांच्या अंतापर्यंत ब्रिटिश भारतात असल्याने आपणास दिसून येते. पेशव्याच्या अंतानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात झाला. आधुनिक भारतात इंग्रजांच्या सामाजिक सुधारणा धोरणामुळे पहिल्यांदा मानवी मूल्य, स्त्री अधिकार अशा जाणिवा हळूहळू भारतीय समाज मनात निर्माण होत होत्या. भारतातील बरेच समाज सुधारक हे विदेशात जाऊन शिकले. इंग्रजी भाषेच्या अभ्यासामुळे त्यांचा जागतिक सांस्कृतिक परंपरांशी परिचय होऊ लागला. त्यामुळे चांगल्या आणि वाईट प्रथांची विभागणी भारतातील संवेदनशील समाजामध्ये ते करू लागले. अनेकांना भारतातील कुप्रथा, विषमता, स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी असे वाटू लागले. त्यातूनच अनेकांनी सामाजिक सुधारणा होण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले, परंतु त्याचवेळी एक मोठा वर्ग हा सुधारणांना तीव्र विरोध करत होता. तो आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कोणताही बदल स्वीकारण्यास तयार नव्हता. त्याला आपली संस्कृती, आपला धर्म आणि परंपरा याच गोष्टी श्रेष्ठ वाटत होत्या. भारतात असलेल्या उतरंडीच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे येथील ब्राह्मणांना मोठे अधिकार प्राप्त झाले होते. सुधारणांमुळे त्यांच्या धार्मिक क्षेत्रातील श्रेष्ठत्वाला धक्का लागण्याची शक्यता असल्याने तो कडाडून या सुधारणांना विरोध करत होता. काही अपवाद मात्र असू शकतात. त्याचवेळी राजाराम मोहन रॉय, डॉक्टर ईश्वरचंद्र विद्यासागर, दयानंद सरस्वती महात्मा फुले, महर्षी धोंडो कर्वे, रानडे, गोखले,आगरकर इत्यादी समाजसुधारक हे सुधारणावादी धोरण राबवण्याचा प्रयत्न ब्रिटिश भारतात करत होते.

बीजसंज्ञा: 

ब्राह्मण,ब्राह्मणेतर, स्त्रीवाद, चळवळ,महिला मुक्ती, स्त्रीमुक्ती.

संशोधन पद्धती:

या संशोधन पेपरमध्ये दुय्यम स्त्रोतांचा वापर करण्यात आला. ज्यामध्ये स्त्रोत म्हणून पुस्तकांचा वापर केला आहे. 

उद्देश्य

1. महात्मा फुले यांच्या स्त्री विषयक सामाजिक सुधारणांचा अभ्यास करणे. 

2. महात्मा फुले यांच्या स्त्री विषयक शैक्षणिक कार्याचा अभ्यास करणे

3. स्त्री मुक्तीच्या चळवळीत महात्मा फुले यांच्या योगदानाचा अभ्यास करणे. 

4. महात्मा फुले आणि आजची स्त्रियांची स्थिती याचा अभ्यास करणे

फुले पूर्व स्त्रियांची स्थिती आणि फुलेचे कार्य:

सती प्रथा:

 पेशवाईचा कार्यकाल व पेशवाईच्या अस्तानंतर भारतातील परिस्थिती ही स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय अमानवी,निर्दयी आणि निंदनीय अशी होती. स्त्रियांना पशु सारखी गुलामीची वागणूक मिळत होती. स्त्रियांना कोणत्याच प्रकारचे अधिकार नव्हते. नवरा मेल्यानंतर सती जाण्याची प्रथा ही सर्वमान्य होती. बालविवाह करत असताना मुलीचे वय अगदीच कमी म्हणजे सहा-सात वर्षाचे असे तर पुरुष हा फारच प्रौढ असे. अशा पद्धतीच्या विवाहातून बाललैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होते. बालिका वधूचे नवरे हे लवकर मेल्यानंतर तरुण वयात त्यांना वैधव्य यायचे. त्यांना या वैधव्यानंतर सती जाण्यासाठी पाठवले जाई.सती म्हणजे पुण्य कर्म. भरल्या कुंकवाने मरण येणे हे भाग्य आहे, अशा पद्धतीने सतीप्रथेची महती धर्मव्यवस्थेद्वारे सांगितली जाई. जी स्त्री सती जाण्यास विरोध करायची तिला जबरदस्तीने सती पाठवले जाई. मेलेल्या नवऱ्यासाठी रचलेल्या लाकडाच्या सरणावर तिला मेलेल्या नवऱ्याचे शीर मांडीवर घेऊन बांधले जाई. चीतेला अग्नी दिल्यानंतर ती बाहेर येऊ नये म्हणून तिला काठीने जबरदस्ती अग्नीत ढकलले जाई. तिचा आकांत, क्रंदन, रडणे,विव्हळणे आणि तडपणे बाहेर ऐकू येऊ नये यासाठी ढोल वाजवून तिचा आवाज दाबला जाई. ही अतिशय क्रूर प्रथा होती. इंग्रजांनी या प्रथेला कायद्याने बंदी केली. तरीसुद्धा सती प्रथा सुरूच होती. महात्मा फुलेंनी अशा सती प्रथेला मोठ्या प्रमाणात विरोध केला. ज्या महिला सती जात नसत त्या महिलांचे टक्कल म्हणजेच केशवपण करून तिला असेच घराच्या कोपऱ्यातील अडगळीतील वस्तूप्रमाणे सांभाळले जाई. अशा स्त्रियांना घरातील पुरुषांच्या नराधमतेला बळी पडावे लागायचे. तिच्यावर समाजमान्य बलात्कारच होत असे. त्यातून त्या गरोदर राहत. विधवा गरोदरपण समाजाला मान्य नसल्याने तिच्यासमोर आत्महत्या करणे किंवा भ्रूणहत्या करण्याशिवाय पर्याय नसे. ही समस्या गंभीर असल्याने या समस्येवर उपाय करणे आवश्यक होते. स्त्रियांच्या या अमानवी अत्याचाराविरोधात ठोस कृती कार्यक्रमाची आवश्यकता आहे असे फुलेंना वाटले. अशा स्त्रियांच्या बाळंतपणासाठी त्यांनी प्रसूतीगृह उघडले. त्यातून जन्मलेल्या मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1864 मध्ये केली. अशा प्रकारच्या संस्था भारतात प्रथमच स्थापन होत होत्या. कदाचित जगात सुद्धा अशा संस्था कोणी स्थापन केल्या नसतील. त्यांनी अशाच विधवा ब्राह्मण बाई काशीबाईच्या मुलास दत्तक घेऊन त्याचे पालन पोषण करून त्यास डॉक्टर केले. त्याचे नाव यशवंत असे ठेवण्यात आले होते. 

विधवा स्त्रियांना टक्कल म्हणजेच केशवपण करून विद्रूप करण्यास महात्मा फुलेंचा प्रचंड विरोध होता. त्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचे प्रबोधन केले. त्यांच्या याच प्रयत्नातून 1865 मध्ये नाभिकांचा अभूतपूर्व संप घडवून आणला. हा संप मानवी मूल्य प्रस्थापित करणारा आणि स्त्रियांना त्यांचे हक्क देणारा असल्याने याची दखल लंडन येथील टाइम्स वृत्तपत्राने घेतली व 9 एप्रिल 1890 रोजीच्या वृत्तपत्रात ही बातमी छापली. 

बालविवाहाला विरोध आणि पुनर्विवाहास प्रोत्साहन:

सती प्रथा, केशवपण या प्रथेचे मूळ हे बालविवाह करणे होय. त्यामुळे सर्वप्रथम फुले यांनी बालविवाहाला विरोध करण्यास सुरुवात केली. बालविवाह विरोधात त्यांनी प्रबोधन केले. बालविवाहा सोबतच विधवांचे पुनर्विवाह होणे आवश्यक होते. त्यांनी ह्या अनिष्ठ प्रथा संपवण्यासाठी कृती कार्यक्रम हाती घेतले. त्यांनी ८ मार्च 1864 रोजी पुण्यातील गोखले वाड्यात सारस्वत जातीतील नर्मदा नावाच्या महिलेचा पुनर्विवाह घडवून आणला. भारताच्या इतिहासातील हा पहिलाच विवाह असावा. या विवाहामुळे अनेक महिलांच्या पुनर्विवाहाची वाट मोकळी झाली. त्यांच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण झाला. 

फुले पूर्व शैक्षणिक स्थिती आणि महात्मा ज्योतिराव कार्य :

शिक्षणाची कुठलीही व्यवस्था ही स्त्रियांसाठी नव्हती. त्यामुळे रोजगार किंवा व्यवसायात सुद्धा महिला कुठेच नव्हत्या. स्त्रियांना प्राथमिक शिक्षण सुद्धा घेता येत नसे. त्यामुळे स्त्रियांना कुठल्याच प्रकारचे मानवी मूल्य,अधिकार यांची अजिबात जाणीव नव्हती. कोणत्याच पद्धतीने महिलांनी विद्रोह किंवा बंड करू नये, यासाठी त्यांच्यावर धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामगिरी मोठ्या प्रमाणात लादली होती. स्त्रिया सुद्धा या परंपरा प्रथा जपण्यातच पुढे होत्या असे आपणास दिसते. 

महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या या गुलामगिरीचे कारण हे अविद्या आहे असे प्रतिपादन केले. आपल्या दुःखाचे कारण शिक्षण नसणे हे आहे, शिक्षण नसणे म्हणजे अधिकारांची जाणीव नसणे, अधिकारांची जाणीव नसणे म्हणजे जागृती नसणे. त्यामुळे मुलींना शिक्षण दिल्याशिवाय त्यांचा उद्धार होणे नाही. याची जाणीव महात्मा फुलेंना असल्याने त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले व आत्या सगुणाबाई क्षीरसागर यांना शिकवायला सुरुवात केली. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना अहमदनगरच्या अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांच्या संस्थेत रीतसर शिक्षक बनण्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 1जानेवारी 1848 ला मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी पुणे येथील बुधवार पेठेतल्या भिडे वाड्यात सुरू केली. या शाळेत शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना नियुक्त केले. त्यांच्यासोबत फातिमा बी शेख ह्या सुद्धा होत्या. या शाळेत त्यांनी सहा विद्यार्थिनींना शिक्षण दिले. त्यात चार ब्राह्मण, एक मराठा आणि एक धनगर जातीच्या मुली होत्या. त्यामध्ये अन्नपूर्णा जोशी वय 5, सुमती मोकाशी वय 5, दुर्गा देशमुख वय 4,माधवी थत्ते वय 6 आणि सोनू पवार वय 4 आणि जानी कर्डिले वय 5 यांचा समावेश होता. त्यानंतर फुलेंनी पुणे आणि परिसरात एकूण 18 शाळा 1852 पर्यंत उघडल्या अस्पृश्यांसाठी पहिली शाळा 1852 मध्ये वेताळ पेठेत सुरू केली. 1853 ला अस्पृश्यांना शिक्षण मिळावे यासाठी “सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन फॉर महार, मांग अँड अदर्स” या नावाची संस्था सुरू केली. 1853 ला पुण्यात वाचनालय सुरू केले. फुलेंच्या शाळेत शिकलेल्या मातंग जातीच्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने व्यवस्थेला प्रश्न विचारणारा निबंध लिहिला. तो आजही प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीने फुलेंनी शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. त्यामुळेच त्यांचा इंग्रज सरकारने मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली 16 नोव्हेंबर 1852 मध्ये सत्कार केला. फुलेंच्या या चळवळीतून स्त्रिया ह्या जागृत होत होत्या. त्याचा परिणाम असा झाला की नंतरच्या काळात अनेक मुलींनी धर्माने नाकारलेले हे शिक्षण महात्मा फुलेंमुळे घेतले, असे म्हणण्यास हरकत नाही. यातून अनेक लेखिका सुद्धा निर्माण झाल्या. तानुबाई बिरजे या पहिल्या संपादिका झाल्या तर रखमाबाई राऊत या पहिल्या डॉक्टर झाल्या. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. शिक्षणामुळे स्त्रीमुक्तीच्या चळवळीस अधिक बळकटी मिळाली.

महात्मा फुले यांचे स्त्री मुक्ती विषयक मत:

महात्मा फुले हे स्त्री पुरुष यांना समान मानतात. ते स्त्रियांना आणि पुरुषांना सारखे अधिकार असल्याचे म्हणतात. जगात फक्त दोन जाती आहेत, एक स्त्री आणि दुसरा पुरुष असे ते प्रतिपादन करतात. त्यांना मूलबाळ नसल्याने नातेवाईकांनी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी फुलेंनी म्हटले की दोष तिच्यातच आहे हे कशावरून? दोष माझ्यात असेल तर मी तिला सवता आणायचा का असा प्रतिप्रश्न करून स्त्रियांबद्दलचा आदरभाव फुले परखडपणे व्यक्त करतात. स्त्री ही जन्मदात्री आहे ती पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे ते मानतात. आईचा खून करणाऱ्या परशुरामाची खरडपट्टी फुले काढतात तर आई-बहिणीची आणि स्वतःच्या मुलीची इज्जत घेणाऱ्या इंद्र व ब्रह्माची मंदिर का नाहीत, लोक त्यांना का पुजत नाही,असा विवेकी प्रश्नही ते आपल्यापुढे उभा करतात. फुले हे अतिशय परखडपणे स्त्रियांना गुलामगिरी ठेवणाऱ्या ग्रंथांच्या भूमिकांचा विरोध करतात.

सार्वजनिक सत्यधर्म आणि स्त्रिया:

सार्वजनिक सत्य धर्मात स्त्रियांना समान अधिकार दिले आहेत. महात्मा फुले यांनी स्त्रियांना व्रतवैकल्यातून मुक्ती देण्याचे काम सार्वजनिक सत्य धर्माच्या माध्यमातून केले.

महात्मा फुले आणि आजची स्थिती:

 महात्मा फुले यांनी समाजात जी क्रांती केली त्यामुळे स्त्रियांचे संपूर्ण जीवनच बदलले आहे. आज संसदेत,शिक्षण संस्थात, वैद्यकीय क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात, खेळाच्या क्षेत्रात अशा अनेक क्षेत्रात महिला आपले नाव उंचावत आहेत. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्यात. राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील आणि आता द्रौपदी मुर्मु विराजमान झाल्यात हा महात्मा फुले यांच्या स्त्री मुक्ती चळवळीचाच परिणाम आहे. आज पूर्णपणे बालविवाह कायद्याने गुन्हा आहे एवढेच नाही तर पालक सुद्धा बालविवाह करत नाहीत. आज विधवा विवाह आणि पुनर्विवाह सर्वमान्य आहे. आज विधवा व परित्यक्ता स्त्रियांना सुद्धा नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे. उद्योग क्षेत्रात कल्पना सरोज हे एक मोठे नाव आहे. तसेच अनेक स्त्रिया उद्योजक म्हणून आज कार्यरत आहे याचे संपूर्ण श्रेय हे महात्मा फुले यांना जाते.

समारोप

आज स्त्रियांच्या बाबतीत जो सकारात्मक मानसिक बदल समाजात झालेला दिसतो त्यास कारणीभूत हे महात्मा फुलेंचे विचार कृती आणि दृष्टिकोन आहे. यालाच फुलेवाद सुद्धा संबोधले जाते. अनेक स्त्री चळवळ व मानव मुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान हे महात्मा फुले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने महात्मा फुले हे स्त्री मुक्ती चळवळीचे नायक ठरतात.

संदर्भ ग्रंथ सूची :- 

1) कीर धनंजय, मालशे स. ग., फडके य. दि.,(2006), ‘महात्मा फुले समग्र ‘ज्योतीबा फुले आणि स्त्री-मुक्तीचा विचार’, लोकवाग्मय गृह, मुंबई. 

2) लांजेवार ज्योती,(2012), ‘फुले-आंबेडकर आणि स्त्री-मुक्ती चळवळ’, संकेत प्रकाशन, नागपूर.

3) सारंग संदीप,(2021), ‘सरस्वती की सावित्री?’, स्पंदन प्रकाशन,नवी मुंबई

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *