कार्यकर्ता

कार्यकर्ता…

जयंतीचा उत्सव …
युगानुयुगे माणूसपण नाकारलेल्या समाजाला ..
माणसात आणणाऱ्या बाप माणसाचा जन्मदिवस…
दरवर्षी साजरा होतो…अगदी सणाप्रमाणे…
या सणाची तयारी महिनाभर अगोदरच करत असतो
कार्यकर्ता…
त्यानं वर्षभर साचवलेली रक्कम…. कार्यक्रमासाठी
लावत असतो कार्यकर्ता…
पायाला बांधून भिंगऱ्या… वाड्या, वस्त्या, तांडे आणि झोपडपट्ट्या
अक्षरशः पिंजून काढत असतो कार्यकर्ता…
अरे ssssss! माझ्या बापाची जयंती आहे…!
म्हणत …
भावुक होऊन वावरत असतो कार्यकर्ता…
इथं इमान विकून जगतात लोकं…पण..
बाबासायबाची पुस्तकं विकून … उदरनिर्वाह करतो कार्यकर्ता..
पर्मनंट झालेले …! शिकले सवरलेले !…
दरवर्षी घालतात गुपचूप सत्यनारायण…कापतात बोकड.. करतात यात्रा….
विहारांमधून उपाशीपोटी … बुद्ध पेरत जातो कार्यकर्ता…
पडलीच ठिणगी आंदोलनाची…
सर्वात पुढे लढायला,काठ्या झेलायला…
पुढे असतो कार्यकर्ता…
रात्रभर त्या वेदनेनं तळमळत राहतो…कार्यकर्ता…
दारिद्र्याची खोक बनून भलभळत राहतो ..कार्यकर्ता…
लागलीच केस तर ‘आत’ जाऊन …
बाहेर वाघासारखा येतो कार्यकर्ता…
केसेसेचे मेडल छातीवर लावून …
स्वाभिमानाने मिरवत राहतो कार्यकर्ता…
कोर्टाची वारी करता करता, आयुष्य संपून जाते….
आयुष्याला ही वाऱ्यावर सोडून देतो कार्यकर्ता…
दोन घास सन्मानाने जे आमच्या ताटात पडतात…
त्याच्यामुळेच तर आमच्या कित्येक पिढ्या घडतात…
झालाच जर अन्याय ..तर निळा झेंडा घेऊन..
सरकार आणि व्यवस्थेशी नडतो…
समाज सावरायला मात्र.. तो स्वतःचे घर सोडतो…
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतले हक्क आणि अधिकार
या फाटक्या कार्यकर्त्यांनीच लढून केलेत साकार…
असो आरक्षण किंवा सवलती…
त्यापाठी बाबासाहेबांचा विचार आणि कार्यकर्त्यांची कृती…
लेखक असतो… कवी असतो …कार्यकर्ता…
व्यवस्थेला शब्दांनी सुरुंग लावत जातो कार्यकर्ता…
भीमगीतांच्या धुंदीत रात्र रात्र घालवतो… कार्यकर्ता
रक्त आटवून …शीरा ताटवून…. पोटतिडकीने प्रत्येक शब्द नी शब्द साठवून….
भीम गीत गातो …कार्यकर्ता…
बिदागी नाही मागत… मिळेल तेवढेच धम्मदान घेतो…
एस.टी.स्टँडवर जे मिळेल ते खातो….
पुढल्या गावी एसटी ने जातो…कार्यकर्ता…
पुरस्कार नम्रपणे नाकारतो …कार्यकर्ता…
फुले नगर ,शाहूनगर ,भीमनगरातल्या चंद्रमौळी झोपडीत राहतो कार्यकर्ता…
कोट्यवधी हालअपेष्टा भोगतो कार्यकर्ता..
म्हाडाचे घर त्याला मिळत नाही…कारण …
सरकारशी त्याचे सूत जुळत नाही…
चौदा एप्रिलला दणक्यात जयंती साजरी करताना…
सहा डिसेंबरला बापाच्या आठवणीने डोळे टचकन भरताना…
नागपूरला विजया दशमीला धम्म्मचक्र प्रवर्तन दिन
पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती दहन …
वीस मार्चला महाडला चाखताना …
चवदार तळ्याचे पाणी…
धमन्यांमधून वाहते त्याच्या भीमरायाची वाणी..
पांढऱ्या शुभ्र रंगात निघतो न्हाऊन …कार्यकर्ता.
अंगात रग आहे तोवर ..
व्यवस्थेशी भांडतो राहून राहून कार्यकर्ता..
आयुष्याच्या संध्याकाळी…
बायका पोर झिडकरतात…
विचारतात काय केलं आमच्यासाठी…?
प्रत्येक वेळी बनून राहिलास समाजाची काठी..
वळतात मुठी त्याच्या …डोळ्यात अंगार पेटतो..
तेंव्हा मला तो कलिंग हरलेला अशोकच वाटतो…
तेंव्हा…
माझ्या बापांन केला असता स्वतःचा विचार..
त्याच्या महालाला असतं …सोन्याचं दार..
रमाई माझी सोन्या रुप्यात-हिरा माणक्यात…
वावरली असती…
ऐन तारुण्यात तिची साथ कधीच सुटली नसती…
चार लेकरं मातीत घालून …तुमा आम्हाला जगवलंय त्यानं…
रमाईनं भोगलंय दुःख …म्हणून तुमच्या आमच्या जीवनाचं झालंय सोनं…
भांडून झाल्यावर एकटा पडतो कार्यकर्ता…
बाबासाहेबांना कवटाळून हमसून हमसून रडतो कार्यकर्ता…
लाज ,स्वाभिमान विकलेले, व्यवहारचोदे शहाणे…
पाजळतात अक्कल…
आणि शिकवतात त्याला…’अर्थ’ ‘शास्त्र’..
अंगावर धावून जात बोलतो
भडव्यांनो..बांधले असतील तुम्ही इमल्यावर इमले..
चढवले असतील मजल्यावर मजले…
पण प्रत्येक वेळी तुम्ही तुमचा बाप विकला…
शत्रूपुढे जाऊन…कित्येक वेळा वाकला…
कोरभर तुकड्या साठी…
शेपूट कितीदा हलवली…
नका सांगू भाड्यांनो…किती वेळा इज्जत घालवली…
माझ्या बापानं …भाकरीपेक्षा स्वाभिमान श्रेष्ठ म्हणून शिकवलंय…
त्याच विचारांवर त्याने अक्ख जग झुकवलंय…
एक वेळ अशीच येते..
त्याच्याजवळ दोनवेळच्या अन्नाची भ्रांत होते..
पाठीवर निंदेचे आसूड ओढून
समाज ही देतो वाऱ्यावर सोडून…
आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या..
कोणीच सोबत नसतो…
जग सोडताना सोबत मात्र..
…गहिवरलेला बाबासाहेबांचा फोटो असतो
….. गहिवरलेला बाबासाहेबांचा फोटो असतो…

प्रा.सागर कांबळे
अभ्यागत सहा.प्राध्यापक.
मो.९९२३७५२२९६

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *